पुणे : मनसेच्या १३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात लिहिणाऱ्यांना घरी जाऊन अद्दल घडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार पुण्यातील कार्यकर्ते एका व्यक्तीच्या घरीदेखील गेले मात्र संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समजल्यावर मात्र त्यांनी माघार घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर भागात राहणाऱ्या विभास जाधव या व्यक्तीच्या घरी बुधवारी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. जाधव याने राज ठाकरे यांच्याशी संबंधित बातमीवर केलेल्या आक्षेपार्ह्य कमेंटबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या कार्यकर्त्यांमध्ये मनसेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते. जाधव याच्या घरी गेल्यावर ते घरी नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी जाधव यांच्या नातेवाईकांशीही कार्यकर्त्यांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अखेर पोलिसांनी मध्यस्ती करत जाधव याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार जाधव याने हा प्रकार यापूर्वीही केल्याचे समोर आले आहे. राजकीय व्यक्तींपासून ते पोलीस प्रशासनातील व्यक्तींवरही त्याने या प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसांनी १४९ नुसार पुन्हा असा प्रकार न करण्याची सूचना देऊन सोडले. याबाबत वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सुनील तांबे यांनी लोकमतला माहिती देताना सांगितले की, जाधव याच्याकडून ही पोस्ट डिलीट करून घेतली. तो विकृत मनोवृत्तीचा असून यापूर्वीही त्याने असाच प्रकार जवळचे नातेवाईक आणि इतर राजकीय व्यक्तींबाबत केला होता. त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले असून पुन्हा अशी कृती घडल्यास कारवाई करण्यात येईल.
दुसरीकडे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी म्हटले की, राज ठाकरे मनसैनिकांचे दैवत आहेत. टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मात्र त्याला संविधानिक भाषेचा आधार असावा. त्यांच्यावरची अश्लील टीका आम्ही खपवून घेणार नाही. जाधव याने तर घरातील महिलांना पुढे करून प्रकरण चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही महिलांशी सन्मानाने आणि संयमाने बोलण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र खरंच जाधव याचे मानसिक संतुलन बिघडले आहे का असा सवाल केला. जर संतुलन बिघडले असेल तर त्याच्या घरचे बाजू का घेत होते असा सवालही त्यांनी विचारला. हा अतिशय गंभीर प्रकार असून ही सोशल मीडियावर उदयाला येणारी विकृती असल्याचे त्या म्हणाल्या.