पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी, संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. मी 14 वर्षे मनसेत काम केलंय, राजकारणात काम कसं करायचं हे मी या पक्षातच राहून शिकले आहे. मात्र, वैयक्तिक कारणासाठी मी पक्षातून बाहेर पडत आहे. नवीन कोणत्या पक्षात प्रवेश घेणार हे अद्याप ठरवलेलं नाही. पण, अनेक पक्षांमधून ऑफर आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच, मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्त्युतर दिलंय.
संदीप देशपांडे असतील किंवा आणखी कुणी असेल, आम्ही भावंडं बनून पक्षात काम केलंय. त्यामुळे, मी आत्ता त्यांना उत्तर देणं म्हणजे त्यांना आणखी दुख देण्यासारखं आहे. मीही त्यांचीच बहिण आहे, त्यांच्याच सोबत वाढलीय, त्यामुळे त्यांना दु:ख झालं असेल. योग्यवेळी मी त्यांना उत्तर देईल, असे एका वाक्यातील प्रत्युत्र ठोंबरे पाटील यांनी दिले.
स्वत:मध्ये बदल करायचाय
पक्षात बदल होत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल करुन घ्यावा लागेल. मात्र, मनसेत काय बदल व्हावा हे सांगण्याइतपत मी मोठी नाही, ते राज ठाकरेच ठरवतील, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. तसेच, मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, असेही ठोंबरे यांनी म्हटलं. काय म्हणाले संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्वीट केलं आहे. "सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'" असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.