पुणे - राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कट्टर समर्थक आणि मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं होतं. यानंतर आज मनसेचा झेंडा हाती घेऊन आणि घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी दाखल झाले. आता त्यांनी सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
अजून नाराज आहात का? असा प्रश्न विचारताच वसंत मोरे यांनी हसत आपलं मत व्यक्त केलं आहे. "घरातली भांडणं आहेत... ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व" असं म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी मनात अजून नाराजी आहे का? य़ावर बोलताना "नाराजी असण्याचं काही कारण नाही. जे आहे ते आहे. मी काल सांगितलं मला जे बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं ते मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालो. दखल घेतली नाही तर घ्यायला लावू. साहेबांच्या तब्येतीचा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. घरातली भांडणं आहेत... ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व" असं म्हटलं आहे.
"कोणकोणाच्या सातबाऱ्यात आलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं हा पक्षवाढीचा विषय आहे. पक्षामध्ये होणाऱ्या कारवाईचा विषय आहे. त्यामुळे तो मिटू शकतो. सभा नेहमीप्रमाणेच जोशपूर्णच होती, तुम्ही सर्वांनी पाहिली, अनुभवली, मला वाटतं साहेबांचं दुखणं बरं झाल्यावर अजून जोशाने काम होईल. टीका या होतच असतात. मी मागे म्हणालो होतो. सर सलामत तो पगडी पचास. साहेब चांगेल राहिले तर आम्ही सगळे चांगले राहू. साहेबांनी स्वत:च्या तब्येतील महत्त्व दिल्याने मला आनंद झाला आहे" अशा शब्दांत वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे यांच्या भाषणाआधी सर्वांची भाषणं झाली पण तात्या कधी बोलणार याची सर्वजण वाट पाहत होते. पण त्यांचं भाषण झालं नाही. यावर वसंत मोरे यांनी तात्या योग्य वेळी बोलतात आणि सर्व त्यांचं ऐकतात असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. याच दरम्यान त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं असं म्हणत निशाणा साधला आहे. "आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.