कल्याण - शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असताना कल्याण जुना पत्रीपूल पाडण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोंडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी पुलावर ठिय्या दिला. यावेळी केडीएमसी, रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्याविरोधात काळे कपडे परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी आ. प्रकाश भोईर, मनोज घरत, कौस्तुभ देसाई, उल्हास भोईर, प्रकाश भोईर, राहुल कामत, सागर जेधे, कस्तुरी देसाई, मंदा पाटील, दीपिका पेडणेकर, ऊर्मिला तांबे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्याचा निर्णय रेल्वे व एमएसआरडीसीने घेतला आहे. २५ सप्टेंबरपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवा पूल लवकर होणे दुरापास्त आहे. कल्याण-शीळ मार्गाचा प्रवास हा पाच तासांचा झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे बोडके आंदोलनस्थळी आले.जुना पत्रीपूल पाडण्याचे काम एमएसआरडीसी व रेल्वेकडून सुरू आहे. मात्र, रेल्वेकडून काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी आहे. आयआयटीकडून काही अहवाल मागवले आहेत. ते आल्यावर त्यांच्याकडून हे काम केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.जुन्या पुलावरील वाहतूक शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक वळवली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचा अंदाज अगोदरच संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवा होता. युद्धपातळीवर काम करून तीन महिन्यांत नवा पूल आम्ही उभारू, असे आश्वासन देणारे अधिकारी आता तांत्रिक अडचणी पुढे करून १२ महिन्यांची मुदत मागत आहेत. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने आज आम्ही ठिय्या दिला. पण, पुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे डोंबिवली शहर संघटक व परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला.तर काम होणार सुरूच्एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय अधिकारी राम जैस्वार हेदेखील आंदोलनस्थळी आले.च्ते म्हणाले, ‘नागरिकांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य आहे. नव्या पत्रीपुलाचे डिझाइन आयआयटीकडे पाठवले आहे. त्याला मान्यता मिळताच पुलाचे काम सुरू होईल.’
मनसेचा पत्रीपुलावर ठिय्या, जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:44 AM