पुणे : खुन्नसने पहात असल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने एटीएम सेंटरमध्ये घुसून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रोहन काळुराम इंगळे (वय २०, रा. फुरसुंगी) यांनी हडपसरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दत्ता भंडारी, सौरभ घोलप, ऋतिक चौधरी, साहिल शेख, शुभम बरकडे, शुभम कामठे व इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
इंगळे हे नवीन मोबाईल विकत घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी भेकराईनगर येथील जनसेवा बँकेच्या एटीएममध्ये गेले असता पान टपरीवर शुभम बरकडे व शुभम कामठे हे त्यांचे मोटारसायकलवर बसून फिर्यादीकडे खुन्न्सने बघत असल्याचे पाहून फिर्यादी हे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले. त्यावेळी त्यांचे मित्र रोहित पाटील व अभिषेक हजगुडे हे बाहेर थांबले होते. यावेळी टोळक्याने हातामध्ये लोखंडी कोयते घेऊन एटीएममध्ये घुसले. त्यांनी इंगळे याला कोयत्याने मारहाण करत एटीएम सेंटरबाहेर आणले. त्यांनी हातातील कोयते सर्वांना दाखवून आम्ही आता कोणाला जिवंत सोडणार नाही, असे ओरडून सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिक तेथून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत