पोलीस, आरटीओ व पीडब्लूडी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, ४०५ अपघातांची नोंद
प्रसाद कानडे
पुणे : रस्ते अपघाताची संख्या कमी करण्यासाठी चेन्नईच्या धर्तीवर पुण्यासह राज्यातील दहा शहरात ‘आयरेड’ हा प्रकल्प राबविला जात आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना अंमलात आणणे हा त्या पाठीमागचा मूळ हेतू आहे. जेणेकरून अपघातांची संख्या कमी व्हावी. यासाठी पोलीस, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. यासाठी ‘मोबाईल अॅप’चा वापर केला जातो. या अॅपवर जिल्ह्यातील ४०५ अपघातांची नोंद झाली आहे.
रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एनआयसी संस्था मोबाईल ॲपच्या माध्यमातून डेटा एकत्र करीत आहे. एकत्रित केलेला डेटा आयआयटी चेन्नईद्वारे विश्लेषण करण्याचे काम होत आहे. त्यामुळे अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सोपे होणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील अपघातांची संख्या
वर्ष अपघात जखमी मृत्यू
२०१९ ६२९ , ३६७, १८३
२०२०, ४१७ , २४७ , १४५
२०२१ , २६० , १७५ , ८५
(जूनपर्यंत)
चौकट २
दोनशे जणांना प्रशिक्षण :
आयआरएडी हे अॅप कसे वापरायचे, त्यात कोणती माहिती कशी सादर करायची, या बाबत जवळपास दोनशे कर्मचारी व अधिकाऱ्यांना एनआयसीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीणचे पोलीस, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश होता. हे प्रशिक्षण वेब तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात आले.
चौकट ३
४०५ अपघाताची नोंद
शहर व जिल्ह्यात जानेवारीपासून झालेल्या अपघाताची नोंद आयआरएडी या अॅपवर करण्यात आली आहे. अॅपवरील माहितीचे विश्लेषण करण्याचे काम आयआयटी, चेन्नई येथे सुरू आहे.
चौकट ४
हे अॅप चालणार कसे :
अपघातानंतर सर्वप्रथम पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघाताचे फोटो व व्हिडीओ अॅपमध्ये अपलोड करायचे असतात. वाहनांचे किती नुकसान झाले ही माहितीही यात भरावी लागते. त्यानंतर आरटीओचे मोटार वाहतूक निरीक्षक घटनास्थळी पोहचून वाहनसह अन्य काही दोष पाहून ती माहिती भरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारीसुद्धा अपघाताच्या कारणाचा शोध घेतात. ही सर्व माहिती अॅपद्वारे रस्ता रस्ता सुरक्षा विभागाकडे एकत्रित केली जाते.
कोट
“शहरातील अपघातांची नोंद या अॅपवर नोंदविण्याचे काम सुरू आहे. यासाठी आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. एनआयसी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक ओंकार योगी व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धनंजय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभत आहे.”
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे