पुणे : तुम्ही रेल्वे स्थानकावर असाल आणि मोबाईल बॅटरीची चार्जिंग कमी झाली असेल तर काळजी करू नका. आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन (किओस्क) बसविण्यात आली आहेत. तुम्ही दहा रुपयांत या मशिनच्या लॉकरमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी ठेऊन कुठेही बिनधास्त फिरू शकतात. तुमचा मोबाईल लॉकरमध्ये सुरक्षित राहील. ही सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेने लांबपल्याच्या प्रवासासाठी अनेक प्रवासी करमणुकीसाठी मोबाईलचा वापर करतात. काहीवेळा स्थानकावर आल्यानंतर मोबाईल बॅटरीचे चार्जिंग झालेले नसते. तर काहीवेळा रेल्वेला विलंब झाल्याने काही तास स्थानकावरच घालवावे लागतात. तिथे चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते. यापार्श्वभुमीवर मध्य रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावर या मशिन बसविण्यास सुरूवात झाली आहे. एकुण १० मशिन सर्व फलांटावर बसविण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी व चिंचवड स्थानकांवरही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक मशिनमध्ये २४ चार्जिंग पॉईंट आहेत. यामुळे एकावेळी २४ मोबाईल चार्जिंगला लावता येऊ शकतात. प्रत्येक मशिनला लॉकरची सुविधा असून त्यासाठी स्वयंचलित प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रति तास दहा रुपये याप्रमाणे प्रवाशांना मोबाईल चार्जिंग करता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. -----------असे करता येईल चार्जिंगमोबाईल चार्जिंग मशिन एटीएमप्रमाणे काम करेल. मशिनमध्ये एक तासासाठी दहा रुपये टाकल्यानंतर बारकोडसह एक छापील स्लिप बाहेर येईल. त्यानंतर लगेच एक लॉकर उघडले जाईल. या लॉकरमध्ये प्रवाशाला मोबाईल चार्जिंगला ठेवावा लागेल. लॉकरचा दरवाजा बंद केल्यानंतर तो स्लीपवर आलेल्या कोड शिवाय उघडणार नाही. त्यामुळे छापील स्लीप प्रवाशांना जपून ठेवावी लागेल. मोबाईल चार्जिंगला लावून प्रवासी कुठेही जाऊ शकतात. स्लीपवरील कोड मशिनच्या स्क्रीनवरील स्कॅनरवर ठेवल्यानंतर लॉकरचा दरवाजा उघडेल. मोबाईल काढल्यानंतर दरवाजा पुन्हा बंद होईल.
पुणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्जिंगला लावा, बिनधास्त फिरा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:27 PM
फक्त ही सुविधा मोफत नसेल.. त्यासाठी तुम्हाला काही चार्जेस असतील
ठळक मुद्दे मध्य रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन बसविण्याचा घेतला निर्णयकोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी व चिंचवड स्थानकांवरही लवकरच ही सुविधाएकावेळी २४ मोबाईल चार्जिंगला लावता येऊ शकणार