कुरकुंभ : जिरेगाव (ता. दौंड) येथे ग्रामस्थांच्या व प्राथमिक शाळेच्या शालेय समितीच्या विनंतीला प्रतिसाद देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान युगाशी ओळख करून देणे व कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने मोबाईल कॉम्प्युटर व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्यात एक दिवस असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमाचे स्वागत केले.
दरम्यान या उपक्रमात जिरेगाव येथील प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतचे एकशे वीस विद्यार्थी सहभागी होणार असून प्रत्येक आठवड्याला तीस मुलांना वर्षभर याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये बसण्याची आरामदायी व्यवस्था तसेच प्रत्येकाला एक संगणक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक्षात संगणक वापरण्याची देखील संधी उपलब्ध होणार आहे. मुलांना संगणकाबाबत साक्षर करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच अलका सूर्यवंशी, उपसरपंच बाळासाहेब भंडलकर, ग्रामसेविका अर्चना भागवत, मुख्याध्यापक तात्याबा खोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता जांभले, समिती ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ लाळगे, अशोक मेरगळ, शरद भंडलकर, अनिल सुतार, महादेव गाढवे, सहशिक्षक वैशाली वाबळे, शोभा गायकवाड, स्वाती जराड, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.