पुणे : कोरोनामुळे शहर बंद करण्यात आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अनेकांना तातडीने दवाखान्यात जाता येणे शक्य होत नसल्याने त्यांच्याकरिता मोबाईल डिस्पेन्सरीचा पर्याय बहुपयोगी ठरताना दिसत आहे. याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील बहुतांशी दवाखाने बंद आहेत. अशावेळी या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपला इलाज करता येणं शक्य झाले आहे. बीजेएस (भारतीय जैन संघटना) व फोर्स मोटर्स यांनी मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम १ एप्रिलपासून सुरू केला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड येथे रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण पुणे जिल्हा रेडझोनमध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच पुण्यातील बराचसा भाग हा प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमाने दिनांक १ ते १५ एप्रिल दरम्यान किमान २२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्या गल्लीपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे व त्यामुळे या उपक्रमाचा सर्वात जास्त फायदा रुग्णांना होत आहे. कोविडच्या पूर्वीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर बाधित रुग्णांची माहिती लवकर प्राप्त झाली तर कोरोनाचा प्रसार थांबवता येण्यास मदत होईल. सरकारी रुग्णालयातील गर्दी कमी आणि रुग्णांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होण्यास मदत होईल.
* उपक्रम काय आहे : * बीजेएस व फोर्स मोटर्स यांच्या वतीने टेम्पोट्रॅव्हलर किंवा मोठ्या अम्ब्यूलंस भाड्याने घेऊन त्याला चारही बाजूने अवेरनेस करण्यासाठी फिरत्या दवाखान्याचे स्वरूप दिले जाते. * त्यामध्ये लाउडस्पीकरची व्यवस्था व लागणारी संभाव्य औषधांची व्यवस्था केली जाते. * डॉक्टरांना लागणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले जाते. * डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी protected gown, hand gloves, masks इत्यादी उपलब्ध करून दिले जाते. * ज्या परिसरात फिरता दवाखाना जाणार असेल त्या परिसरातील स्वयंसेवकांच्या सहाय्याने व लाउडस्पिकरच्या सहाय्याने रुग्णांना दवाखान्यापर्यंत येण्याची विनंती करण्यात येते. * रुग्णांना सोशल डीस्टन्सिंग न मोडता १-१ मीटर अंतरावर रांगेत बसविण्यात येते. * डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ती औषधे दिली जातात. * कोरोना संदर्भात संशयित असणाऱ्या रुग्णांची यादी त्वरित संबंधित महानगरपालिका आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येते.