पुणे : शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या साडेबाराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारे फुटेज आता पोलीस उपायुक्त आणि त्यावरील दर्जाचे सर्व अधिकारी थेट मोबाईलमध्येच पाहू शकणार आहेत. आयुक्तालयामध्ये असलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्हीचा ‘फीड’ आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर देऊन पुणे पोलिसांनी आधुनिकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा प्रयोग राज्यातील बहुधा पहिलाच प्रयोग आहे. जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोट, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या, या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले. या सीसीटीव्ही फुटेजमुळे गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३००च्या आसपास गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. आयुक्तालयाच्या मॉनिटरिंग रूममध्ये संगणकावर बसलेले २० कर्मचारी दिवसरात्र २० फूट लांबीच्या ‘व्हिडीओ वॉल’वर शहरातील घडामोडी बघत असतात. गुन्हा घडताना दिसताच संबंधित भागाच्या पोलिसांना याची माहिती देऊन कारवाई करण्यात येते. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे दिसणारे शहर आणि शहरातील घडामोडी उपायुक्त, अतिरीक्त आयुक्त, सह आयुक्त आणि पोलीस आयुक्त ‘लाईव्ह’ पाहू शकणार आहेत. काही अधिका-यांच्या मोबाईलवर तर ही यंत्रणा कार्यान्वितही झाली आहे. त्यासाठी या सर्व अधिका-यांचे मोबाईल क्रमांक घेण्यात आलेले असून ते आयुक्तालयातील सॉफ्टवेअरशी जोडण्यात आले आहेत. इंटरनेट कनेक्टीव्हीटीद्वारे हे चित्रीकरण अधिकारी मोबाईलवर पहात आहेत. मोबाईल स्क्रिनवर एकावेळी चार ठिकाणांवरचे फुटेज पाहता येत आहे. ही स्क्रिन पुढे मुव्ह केल्यानंतर हव्या त्या ठिकाणांवरील फुटेज लाईव्ह पाहता येत आहे. वाहतूक शाखेच्या महिन्याला साडेसातशे कारवाया-जून महिन्यात शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून १८ आॅक्टोबरपर्यंत वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तब्बल ३ हजार ६७८ कारवाई केल्या आहेत. सिग्नल तोडणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, सीट बेल्ट नसणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे असणे अशा विविध कलमांखाली केलेल्या कारवायांमध्ये ३ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांकडून वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.-सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागणारे ‘स्ट्रीट क्राईम’ सारखे गुन्हे विशेषत: सोनसाखळी चोरी, वाटमारी, अपघात, खून, खुनाचा प्रयत्न आणि संशयित वाहने व व्यक्ती यांच्यावर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसोबतच थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. सीसीटीव्हीमधील फुटेज या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरच थेट दिसत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.साडेबाराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे होणाऱ्या चित्रीकरणादरम्यान किती गुन्हे घडले, किती गुन्ह्यांचा छडा लागला, किती वाहनांनी वाहतूक नियमभंग केला याची सविस्तर माहिती वरिष्ठांना सादर करावी लागते.बऱ्याचदा कोणतीही अनुचित घटना सीसीटीव्हीत पाहिली की कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देतात.सीसीटीव्ही मॉनिटरिंगद्वारे आधुनिकतेकडे पाऊल टाकलेल्या पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आणखी नवा आयाम ‘पोलिसिंग’ला जोडला आहे.
पोलिसांची शहरावर ‘मोबाईल नजर’
By admin | Published: October 20, 2015 3:17 AM