काेथरूड (पुणे) : भरधाव सिमेंट काँक्रीट मिक्सरने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील कोथरूड बसस्टँडसमोर घडली. मोबाइलवर गप्पा मारत निघालेली तरुणी दुभाजक ओलांडत होती, त्यावेळी भरधाव सिमेंट मिक्सरने तिला धडक दिली. कर्वे रस्त्यावर गंभीर स्वरूपाच्या अपघातांचे सत्र कायम आहे.
आरती सुरेश मनवानी (२३, रा. एरंडे हाॅस्टेल, भेलके नगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आरती मूळची अमरावतीमधील आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. अपघाताची माहिती तिच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली असून, रात्री तिचे कुटुंबीय शहरात दाखल झाले. अपघातानंतर सिमेंट काँक्रीट मिक्सर चालक (एमएच १२ डब्ल्यू जे ६२८५) सकीम अन्सारी (२५, रा. उत्तर प्रदेश) हा पसार झाला हाेता. पाेलिसांनी त्याचा शाेध घेऊन त्याला अटक केली असल्याची माहिती अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे यांनी दिली.
आरती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. कर्वे रस्त्यावरील दामोदर व्हिला सोसायटीकडून ती कोथरूडच्या पीएमपी बसस्थानकाकडे निघाली हाेती. ती दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी ती मोबाईलवर बोलत होती. समोरून भरधाव वेगाने आलेला सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक तिच्या नजरेस पडला नाही. त्याच्या चाकाखाली ती चिरडली गेली, त्यातच तिचा मृत्यू झाला.
अपघाताचे दृश्य पाहून या भागातून निघालेले वाहनचालक, तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. वाहनचालकांनी सिमेंट काँक्रीट मिक्सर चालकाला पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालक भरधाव वेगात पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पाेलिसांनी चालकाचा शाेध घेऊन त्याला अटक केली. अपघातानंतर कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती, ती वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.
मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे..
शहर, परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी शिक्षणासाठी स्थायिक झाले आहेत. वाहन चालवताना अनेकजण मोबाईलवर बोलत असतात तर, अनेकजण मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात. मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणे, तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघात घडतात. कर्वे रस्त्यावर बुधवारी सकाळी डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडत होती. दुभाजकावर चढून ती रस्ता ओलांडत असताना तिला डंपरने धडक दिली.
कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा..
कर्वे रस्ता गजबजलेला रस्ता आहे. दिवसा, तसेच रात्रीही या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात १९ ऑगस्ट रोजी सायकलस्वार निवृत्त कृषी अधिकारी सुनील भास्करराव देशमुख (६०, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. रससाळा चौकात जून महिन्यात जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी (६७, रा. कोथरूड) यांचा मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकाने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गीतांजली श्रीकांत अमराळे (३५, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) यांचा मृत्यू झाला होता, तर दुचाकीस्वार श्रीकांत गंभीर जखमी झाले होते.