पुणे : अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करीत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर केल्यानंतर आता नाट्य व्यवस्थापनाकडून देखील प्रेक्षकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यानुसार पुण्यातील नाट्यगृहांमध्ये ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चा संदेश देणारे फलक लावले जाणार आहेत. महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यांनी प्रेक्षकांची काहीशी कानउघाडणी करणारी खरमरीत पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. नाटकात काम न करण्याचा विचार त्यांनी उद्विग्न भावनेतून बोलून दाखविला होता. त्यामुळे नाट्य वर्तुळात खळबळ उडाली. सोमवारी भावे यांनी स्वत:च पुढाकार घेत बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये झालेल्या ‘अश्रूंची फुले’नाटकादरम्यान ‘मोबाइल फोन सायलेंट मोडवर ठेवा’ असे सांगणारा फलक ठळकपणे लावला होता. सुबोध भावे व नाटकातले दोन सहकलाकार स्वत: उभे राहुन प्रेक्षकांना मोबाइल फोन बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. डोअर कीपरदेखील प्रेक्षकांना मोबाइल बंद ठेवण्यास सांगत होते. तसाच प्रयोग आता पुण्यात पालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांसह इतर नाट्यगृहांमध्ये केला जाणार आहे. नाट्यगृहांमध्ये ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा, असे सांगणारा फलक दोन दिवसात लावण्यात येईल. तसेच राज्यातील नाट्यगृहांच्या अडचणींसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी गेल्या आठवड्यात व्यवस्थापकांची बैठक घेतली. नाट्यगृहात जॅमर लावता येईल का? मोबाइल फोनसाठी लॉकर उपलब्ध करून देता येतील का? यावर तसेच नाट्यगृहांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. जॅमर लावणे व्यवहार्य नाही. शहरातील नाट्यगृहांना भेडसावणाºया अडचणींसंदर्भात भवन विभाग आणि वरिष्ठ अधिकाºयांशी सतत चर्चा सुरू असल्याचे रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:08 IST
अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर बोलून दाखवला होता..
पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक
ठळक मुद्दे नाट्य व्यवस्थापनाने घेतला निर्णय