पुणे : गणेशोत्सव काळात महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शहराच्या मध्यवर्ती भागात ही टॉयलेट बसविलीच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिलांचे प्रचंड हाल झाले.गणेशोत्सव काळात संपूर्ण राज्यातून भाविक पुण्यात येत असतात. यंदाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव असल्याने महापालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, मूलभूत सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. महापालिकेकडून सीटच्या भाषेत आकडेवारी दिली जाते. परंतु, प्रत्यक्षात ज्या ठिकाणी गरज आहे, तेथेच स्वच्छतागृहे नसल्याचे वास्तव आहे. तुरळक ठिकाणी स्वच्छतागृहांचे दिशादर्शक आहेत.‘लोकमत’च्या चमूने गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिलांशी संवाद साधला असता शहरात धक्कादायक परिस्थिती असल्याचे दिसून आले. याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवाच्या निमित्त ड्युटी बजावणाºया महिला पोलीस कर्मचाºयांना झाला. खासगी कार्यालयांमध्ये विनंती करून गरज भागवावी लागली, असे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या काळात तर खूपच हाल झाले. तब्बल ४८ तास बंदोबस्तासाठी रस्त्यावर थांबावे लागले. आसपासची हॉटेल, जवळची पोलीस चौकी, शाळा किंवा रुग्णालय हाच काय तो बंदोबस्तादरम्यान महिला पोलिसांचा आधार असल्याचे दिसले.टॉयलेट घेतली; पण हवी तिथे बसवलीच नाहीतमहिलांसाठी म्हणून महापालिकेने फिरती स्वच्छतागृहे तयार ठेवली; पण शहरात जागा नाही म्हणून त्यातील अनेक स्वच्छतागृहे उपनगरांमध्येच बसवली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत शहराच्या मध्य भागात फिरणाºया महिलांची अडचण झाली. कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांनाही याचा त्रास झाला.महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला जागरूक राहायला सांगितले आहे. विशेषत: गणेशोत्सव काळात अनेक महिला देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. विसर्जन मिरवणुकीतही त्यांची संख्या बरीच असते. त्यांची या नैसर्गिक कामासाठी अडचण होऊ नये, या हेतूने महापौरांनी प्रशासनाला फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने स्वच्छतागृहे उपलब्ध केली; मात्र ती आवश्यक त्या ठिकाणी ती बसवलीच नाहीत.फिरती स्वच्छतागृहे महापालिकेची नाहीत. निविदा काढून महापालिका ती खासगी ठेकेदारांकडून उपलब्ध करून घेते. त्याप्रमाणे तब्बल १० लाख रुपये देऊन या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. त्याला सांगेल त्या ठिकाणी तोही फायबरची फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देत असतो. त्याप्रमाणे गणेशोत्सव काळात शहराच्या विविध भागांमध्ये अशी २०० पेक्षा जास्त स्वच्छतागृहे बसवण्यात आली असल्याची महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, ती कुठे बसवली ते पाहिले असता उपनगरांमध्येच जास्त प्रमाण असल्याचे दिसत आहे.शहराच्या मध्य भागात जिथे मंडळांचे देखावे पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी होते अशा ठिकाणी स्वच्छतागृहे असण्याची गरज होती. शहरात फक्त महिलांसाठी म्हणून एकूण २२ ठिकाणी अशी स्वच्छतागृहे होती. त्यात एकूण ६६ सीटहोती. हिराबाग, एस.पी. कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, हत्ती गणपती, हुजूरपागा, विजय चित्रपटगृह, शनिवारवाडा, टिळक पूल अशा ठिकाणी महिलांसाठीची स्वच्छतागृहे होती. त्याचा वापरही झाला; मात्र महिलांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ती संख्या अपुरी होती.थोड्या वापरानंतर या स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्याचे काम झाले नाही. त्यासाठी कर्मचारी ठेवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रात्री उशिरानंतर अस्वच्छतेमुळे या स्वच्छतागृहांचा वापर थांबला. अंधाºया जागेत स्वच्छतागृहे बसवण्यात आली. त्यातील काही ठिकाणी सुरक्षेचाही प्रश्न होता. त्याचीही काही व्यवस्था नव्हती, असा काही महिलांचा अनुभव आहे. तसेच, मुख्य रस्त्यापासून बºयाच लांब ती असल्यामुळे त्याची कोणाला फारशी माहितीही नव्हती. व्यवस्थित नियोजन करून, गर्दीच्या ठिकाणी काही सुरक्षा देऊन, तसेच स्वच्छता करण्याची काही व्यवस्था करून ही स्वच्छतागृहे बसवण्यात आली असती तर त्यांचा वापर झाला असता, असे काही महिलांनी सांगितले.
मोबाईल टॉयलेटची घोषणा कागदावरच, महापालिकेची सुविधा कोलमडली : गणेशोत्सवादरम्यान महिलांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:45 AM