सांगवी: बारामती तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी, मोबाईल सह इतर वस्तूंची चोरी करणाऱ्या दोघांना बारामतीच्या गुन्हेशोध पथकाने जेरबंद केले आहे. दोन आरोपींना अटक करून चौकशी दरम्यान २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हेशोध पथकाने एका पाठोपाठ केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्र मोडकळीस आले आहे.
रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने (वय २० रा.सुर्यनगरी, ता.बारामती), ओंकार सुनील चंदनशिवे (वय २० रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहन उर्फ कल्ल्या माने याला मागील काळात देखील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
यामध्ये दोघांकडून ५ मोटार सायकल, ५ मोबाईल,२५ हजार रूपये किमतीच्या तांब्याच्या पटटया असा एकूण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चेारीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी मोटार सायकल चोरी उघड करण्या बाबतचे आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने, ओंकार सुनील चंदनशिवे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असता मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदरची कामगिरी गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.