पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे पुन्हा शहरात कडक निर्बंध लागू केले होते. रुग्णसंख्या कमी होताच कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसे छोट्या-छोट्या कामासाठी बाहेर पडत आहे. मोबाईल दुरुस्ती हे त्यातलेच एक काम असून मोबाईलच्या दुकानांत सध्या खूप गर्दी आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे कुठलेच नियम पाळले जात नाहीत. असे दिसून येत आहे. ‘मोबाईल बिघडला तरी चालेल; पण आरोग्य बिघडायला नको !’ असेच या मंडळींना सांगण्याची पाळी आली आहे.
आजच्या धावपळीच्या युगात मोबाईलला अधिक महत्त्व आहे. एक मिनीट जरी मोबाईलकडे पाहिले नाही तर लोक बेचैन होतात. अविभाज्य घटक बनलेला हा मोबाईल जर बिघडला तर सध्याच्या काळात कोणालाच दम निघत नाही. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद असलेली मोबाईलची दुकाने उघडल्यानंतर आता मोबाईलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी गर्दी होऊ लागली आहे. परंतु ज्या कोरोनामुळे आपण घरात बसून होतो, तोच कोरोना या गर्दीत गाठण्याची भीती आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले, तरी कोरोना अजून हद्दपार झालेला नाही याचे भान राखण्याची गरज आहे.
चौकट
मोबाईलदुरुस्ती कशासाठी?
-स्क्रीनगार्ड खराब झाले
-‘मोबाईल बॉडी’ बदलायचीय
-बॅटरी खराब झालीय
-टचपॅड खराब झालय
-चार्जर बंद पडलाय
-स्पीकर किंवा माईक बंद पडलाय
-ओटीजी केबल घेणे
-हेडफोन बंद पडले असून नवीन खरेदी करणे
चौकट
दीड महिन्यापासून बाजार बंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले, असले तरी अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. दुसरी लाट ओसरायला सुमारे दीड ते दोन महिने दुकाने बंद ठेवावी लागली.
चौकट
मोबाईल महत्त्वाचाच, पण आरोग्य?
“मोबाईलच स्पीकर बंद पडला आहे. त्यामुळे आवाज येण्यास त्रास होतो. यामुळे त्रास सहन करावा लागत होता. दुरुस्तीसाठी दुकानामध्ये आलो आहे. कोरोनाची भीती आहेच. योग्य काळजी घेऊनच येथे वावरत आहे गर्दी असली तरी कामही महत्त्वाचे आहे.”
- मनोज यादव.
चौकट
“मोबाईल खराब झाल्याने काम करण्यास अडचणी होत आहे. माईक खराब झाल्याने समोरच्या व्यक्तीला आवाजच जात नाही. यामुळे कामाचे नुकसान होत आहे. मोबाईल दुरुस्तीसाठी खूप गर्दी आहे. याची जाणीव आहे. सुरक्षित अंतर पाळले जात नाही. पण नाईलाज आहे, मोबाईल तर दुरुस्त करावाच लागणार आहे.”
-भावर चौधरी.
चौकट
दीड महिन्यानंतर शटर उघडले
“कोरोनामुळे धंद्याची वाट लागली आहे. पहिल्या लाटेत तीन ते चार महिने आणि दुसऱ्या लाटेत दीड महिना दुकान बंद होते. व्यवसाय ठप्प असल्याने सगळे व्यवहार थांबले होते. आता दुकानांमध्ये गर्दी दिसत असली, तरी काही दिवसांत ती कमी होईल.”
-गोवाल सिंग सिलोईया, मोबाईल शॉपी, चालक.
चौकट
“लाखो रुपयांचा माल पडून आहे. एक-दोन दिवसांत एवढ्या मालाची विक्री होत नाही. त्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे. दुकानाचे भाडे, लाईट बिल, इतर खर्च हा करावाच लागतो. अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. दीड महिन्यानंतर शटर उघडले असले तरी म्हणावा तसा व्यवसाय होत नाही.”
-गोविंद पटेल, मोबाईल शॉपी, चालक.
(दोन प्रतिक्रिया. दोन मोबाईल दुकानदारांच्या प्रतिक्रिया)