पुणे : दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणारे आणि तसे दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दूध दराबाबत आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यामध्ये दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दूध भेसळ खोरांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली छापा टाकण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा दुग्धविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, ग्रामीण पोलीस अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी असणार आहेत.
वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी मोक्का लावण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दूध भेसळखोरांवर मोक्का लावता येईल, का याबाबत कायदेशीर बाजू तपासण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ज्या दुग्ध संस्थांना भेसळीत दूध विकले जाते त्या संस्थांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
दूध भेसळ रोखल्यास दुधाची आवक कमी होईल
महसूल यंत्रणेत अतिरिक्त ठरलेले कर्मचारी अन्न औषध प्रशासनाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. अन्न औषध प्रशासनाने दूध भेसळ रोखल्यास दुधाची आवक कमी होईल. - राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री
फुगवटा कमी होईल
याबाबत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, “या संदर्भातला घेतलेला निर्णय मोठा आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूध कमी होईल. सध्या राज्यात दुधाचा अतिरिक्त २० लाख लिटरचा फुगवटा निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादनाचे खरे चित्र समोर येईल. भेसळ दूर झाल्याने ग्राहकांनादेखील शुद्ध दूध मिळेल.”