पुणे : दमदाटी करुन मालमत्ता हडप केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे सह त्याच्या टोळीतील १३ जणांवर शहर पोलिसांनी आज मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. रवींद्र बऱ्हाटे याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार असून अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही.रवींद्र बऱ्हाटे, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजित शिवदत्त सिंग, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, गणेश आंमदे, नितीन पवार अशी मोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत.अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश काढले. याप्रकरणी सुमंत देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९, ४५ आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. देठे यांचा मांजरी ग्रीन येथे बंगला असून त्यांचे हॉटेल आहे. हा सर्व प्रकार जून २०१७ ते जून २०२० दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांच्यावर एका फायनान्स कंपनीचे ८० लाख रुपयांचे कर्ज होते़ ते फेडण्यासाठी फायनान्स कंपनीकडून तगादा लावला होता. आरोपींनी त्यांना २५ लाख रुपये महिना ५ टक्के व्याजाने कर्ज दिले होते. त्यांनी सव्वा अकरा लाख रुपये परत केले. तसेच आरोपी हे त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण करुन ४ ते ५ लाख रुपयांचे बील केले होते. असे असतानाही त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तसेच ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी, त्यांची पत्नी यांचे फोटो, अंगठे व सह्या घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट दस्त तयार केला व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.
रवींद्र बऱ्हाटेसह १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई; रो हाऊस हडपण्याचा केला होता प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:07 PM