पुणे : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणार्या चोरट्यांच्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
टोळीप्रमुख अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण, सागर ऊर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे, मोहरम शफी शेख, शहाबाज शरीफ नदाफ, राजेश मंगल मंडल, इमाम जलालउद्दीन सय्यद, महादेव गौतम थोरा, अलिशान रफीक शेख, जय विलास तुपे अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पुणे स्टेशन परिसरातून रिक्षामध्ये बसवून थोड्या अंतरावर गेल्यावर इतर आरोपींना रिक्षात बसवून प्रवाशांना मारहाण करुन, त्यांच्यावर चाकूने वार करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेत असत़ या ९ जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात टोळी प्रमुख अल्ताफ पठाण याने इतरांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे आढळून आले.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी या टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्यास मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने गेल्या वर्षभरात ४१ टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.