पुणे : टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या हेतूने डोक्यात कोयत्याने वार करून व लाकडी दांडक्याने मारहाण करणा-या टोळीतील आरोपींवर मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लेन नं.१२, संकेत विहार, फुरसुंगी, हडपसर येथे घडली.
राहुल हरी घडई (वय २३, रा. म्हसोबा मंदिराजवळ, गणेश कॉलनी, काळे पडळ, पुणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अस्लम पोपट शेख (वय २३, रा. तिरंगा चौक, आदर्शनगर देवाची उरुळी, पुणे), स्वप्निल ऊर्फ ऋषभ महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर), शुभम हरिवंश तिवारी (वय १९, रा. ससाणेनगर, हडपसर), अनिकेत राजू वायदंडे (वय २२, रा. साईविहार कॉलनी, हडपसर), ओकांर गोरख वाघमारे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर), आमिर ऊर्फ तिवारी अस्मद शेख (वय २३, रा. सय्यदनगर, वानवडी), सौरभ लिंबराज घोडके (वय १९, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची), अर्शद शरीफ पटेल (वय १९, रा. आदर्शनगर ऊरळी देवाची) अविनाश ऊर्फ अवी भाऊराव पाटील (वय २३, काळेपडळ हडपसर), प्रशांत देवज्ञे (रा. काळेपडळ) व एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. रहिम करिम शेख (रा. काळेपडळ, हडपसर) याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी १५ ते २० आरोपींच्या टोळक्याने फिर्यादीच्या वडिलांसोबत गाडी पार्क करण्याच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार करून व लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना जिवंत असल्याचे पाहून त्याच्या तोंडावर दगड मारून परिसरात दहशत माजवत मदतीला कोणालाही येऊ दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१), ३ (२),३ (४) चा अंतर्भाव करणेबाबत मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांच्या कार्यालयाकडे पाठविला असता त्यांनी मोक्काची कारवाई करण्यास मंजुरी दिली. त्यावरून हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करणेत आली आहेत. पुढील तपास कल्याणराव विधाते सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर करीत आहेत.