पुणे : पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलू गवळीच्या खुनाची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व त्याच्या साथीदारांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.
विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोंमेंटचा माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक आहे. बबलू गवळी याने २०१६ च्या गणशोत्सव विसर्जन मिरवणुकीत यादव याच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या साथीदारांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ७ काडतुसे, रोकड जप्त केली होती. राजन याच्याकडील मोबाईलमधील व्हॉट्सअॅपच्या संभाषणावरून यादव याने बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यासाठीच त्याने ही शस्त्रे पुरवल्याचे उघड झाले. राजमणी याला अटक केल्याचे समजल्यावर यादव फरार झाला होता. त्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात-राजस्थान बॉर्डरवर अटक केली होती.
यादव याने साथीदारांबरोबर मिळून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. टोळी प्रमुख विवेक यादव याने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या सहकार्याने मोक्का प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. चव्हाण यांनी प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे अधिक तपास करीत आहेत.