लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील भाजी मार्केटजवळ रात्रीच्या वेळी व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या गणेश पवार व त्याच्या ६ साथीदारांवर अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
गणेश काविश पवार (वय १९, रा. दत्तनगर), अजय भागवत घाडगे (वय २०, रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द), शुभम उमेश अबनावे (वय २१, रा. राहुल कॉलनी), गणेश दीपक रेणुसे (वय २१, रा. दत्तवाडी), प्रज्योत पांडुरंग भोसले (वय २१, रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा बबन लोखंडे (वय २०, रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) हा फरार आहे.
दिलीप भाेंगळे (वय ५२, रा. हडपसर) हे व्यापारी २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता दुचाकीवरुन घरी जात असताना चोरट्यांनी शेवकर चाळीतील रस्त्यावर दुचाकी आडवी लावून भोंगळे यांना थांबविले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील ब्रेसलेट, गळ्यातील सोनसाखळी असा ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. या गुन्ह्यात हडपसर पोलिसांनी गणेश पवारसह ५ जणांना अटक केली. गणेश पवार हा साथीदारांच्या मदतीने परिसरात टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे, या हेतूने दहशत निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. चव्हाण यांनी प्रस्तावाची छाननी करून त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते अधिक तपास करीत आहेत.
--
हडपसर परिसरात टोळीची दहशत
गणेश पवार व त्याच्या साथीदारांवर गेल्या काही वर्षात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हाणामारी असे प्रत्येकावर ४ ते ५ गुन्हे दाखल आहेत. हडपसर परिसरात ही टोळी स्वत:ची दहशत निर्माण करून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.
---
मोक्का अंतर्गत ९ कारवाया
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोक्का अंतर्गत ९ कारवाया झाल्या असून गेल्या दोन महिन्यांतील ही पाचवी कारवाई आहे. तसेच, आतापर्यंत १५ जणांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाया करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. नव्या वर्षात ७ एम पी डी ए कारवाया झाल्या आहेत.