लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील ही ९ वी कारवाई आहे.
जयेश लोखंडे (वय २०, रा. मंगळवार पेठ), निखील कुसाळकर (वय २२, रा. वडारवाडी), रोहित धोत्रे (वय २१, रा. जुनी वडारवाडी), सुबोध सरोदे (वय २०, रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर) आणि जितेंद्र जंगम ऊर्फ गोहिरे (वय ३१, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर) अशी मोका कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सनी पवार हे रिक्षाचालक असून ते ४ जानेवारी रोजी रात्री पाऊण वाजता घराजवळ गाड्या पाहण्यासाठी घराबाहेर आले होते. तेव्हा अचानक ४ दुचाकीवरुन ८ जण आले. त्यांचे हातात तलवारी, कोयते, गज व काठ्या होत्या. त्यांनी पवार यांना तुझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, तू एवढे पैसे कमवतो, आम्ही पांडवनगरचे भाई लोक आहे. तु आम्हाला हप्ता का देत नाही, असे म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले होते. तसेच पवार यांची रिक्षा, दोन कार, एक दुचाकी तसेच इतरांच्या काही वाहनांची कोयत्याने तोडफोड करुन परिसरात दहशत पसरविली होती.
चतु:श्रृंगी पोलिसांनी टोळीप्रमुख जयेश लोखंडेसह पाच जणांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला. जयेश लोखंडे व त्याच्या साथीदारांनी खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जखमी करुन जबरी चोरी, दरोडा, हत्यारे, पिस्तुले बाळगणे, खंडणी मागणे अशी गंभीर गुन्हेगारी कृत्ये सातत्याने केलेली आहेत. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यावर भर दिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ९ वी कारवाई आहे.