पुणे : हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठी दहशत पसरविणार्या शुभम कामठे याच्या टोळीवर अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
दत्ता भिमराव भंडारी (वय २४, रा. पापडेवस्ती, हडपसर), सौरभ विठ्ठल घोलप (वय २२, रा. काळे पडळ, हडपसर), ऋतिक विलास चौधरी (वय २१, रा. पापडेवस्ती, हडपसर), साहिल फकिरा शेख (वय २१, रा. पापडेवस्ती, हडपसर), शुभम कैलास कमाठे (रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन इंगळे व त्याचे मित्र अभिषेक व रोहित हे नवीन फोन विकत घेण्यासाठी जात असताना फुरसुंगी येथे १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन तसेच भाईगिरीच्या वर्चस्वावरुन दत्ता भंडारी व इतरांनी रोहन याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. टोळीप्रमुख शुभम कामठे अजूनही फरार आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला. चव्हाण यांनी त्याला मंजूरी दिली असून त्याचा सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यांच्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मोक्का कारवाया झाल्या असून चालू वर्षातील ही १६ वी कारवाई आहे.