पुणे : येरवडा परिसरात तिघांवर जीवघेणा हल्ला करून दहशत निर्माण करणा-या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुखासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे (टोळीप्रमुख), अशितोष सुभाष अडागळे, शिवराज मनोज मिरगळ, तेजस हरिदास दनाने, विवेक ऊर्फ शुभम दुर्गेश सिंग, कुणाल ऊर्फ सोनबा संजय चांदने, संदीप सुग्रीव घोडेस्वार, रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भोंडे, दीपक दत्तु मदने, करण भारत सोनावणे, महेश सुनील कांबळे, अजय युवराज कसबे, अनिकेत अनंत कसबे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 307, 395, 452, 504, 506, 427 आर्म अँक्ट कलम 4 (25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीने तिघांवर जीवघेणा हल्ला केला असून, एका व्यक्तीला दगड मारून हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तलवार, कोयते, पालघन अशी घातक हत्यारे साक्षीदारांच्या घरावर मारून, त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील सामान फेकून दिले तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली.
टोळीप्रमुख प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे याने संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकट्याने व संयुक्तरित्या स्वत:चे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता व आर्थिक फायदा मिळविण्याकरिता गुन्हे केले आहेत. मोक्का लावण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना पाठविला होता. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर या गुन्ह्यात मोक्काचे कलम समाविष्ट केले आहे. या गुन्ह्याचा तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.
---------------------------------------------------------------