पुणे : मौजमजा करण्यासाठी पैसे नसल्यामुळे हडपसरमधील पेट्रोपपंप कर्मचाऱ्याकडून तब्बल ८ लाख ७४ हजारांची रोकड लुटणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. सलग तीन दिवस अहोरात्र तपास करून सुमारे १९ किलोमीटर परिसरातील २५० पेक्षा जास्त सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती मिळवली. त्यानंतर पथकाने न थकता काम करीत आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतले.
उबेर अन्सार खान (वय २० रा. सय्यदनगर, हडपसर), अरबाज नवाब पठाण (वय १९ रा. हडपसर), तालीम आसमोहमद खान (वय २०, हडपसर), अजीम ऊर्फ आंट्या महंमद हुसेन शेख (वय २२), प्रजोत कानिफनाथ झांबरे (वय २०, रा. हडपसर), शाहरूख उर्फ अट्टी रहिम शेख, रा. हडपसर अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात असलेले पेट्रोपपंप मँनेजर १४ जूनला पावणे नऊ लाखांची रोकड घेऊन बँकेत जात होते. त्या वेळी कोयत्याच्या धाकाने त्यांच्याकडील रोकड चोरून नेण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत होते. आरोपी सराईत गुन्हेगार असून मौजमजा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रजोत झांबरे याने सय्यदनगरमधील पंपावरील रोकडची माहिती सराईत उबेर खानला दिली. त्यानुसार आरोपी अरबाज आणि तालीम खान याने १४ जूनला पेट्रोलपंप व्यवस्थापक रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात असताना त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी ठेवला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरुद्ध ३७ वी मोक्काची कारवाई केली आहे.
ही कामगिरी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर आयुक्त अशोक मोराळे, डीसीपी श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, महेश वाघमारे, अश्रुबा मोराळे, अजय गायकवाड, रमेश भिलारे, विनोद शिवले, दाउद सय्यद, प्रमोद टिळेकर, अमरचंद्र उगले, विलास खंदारे, संजय दळवी, स्वाती गावडे, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.