बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलमध्ये खंडणी मागणाऱ्या नितीन तांबे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी माहिती दिली.
शिरगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी रात्री ०८:३० वा.ते ०९:४५ वा. दरम्यान यातील फिर्यादी त्यांचे स्नेहा गार्डन (फलटण रोड बारामती ता. बारामती ) हॉटेलवर होते.यावेळी हॉटेलमध्ये आरोपी नितीन बाळासो तांबे (रा.पाहणेवाडी ता.बारामती) तसेच आरोपी अमिन दिलावर इनामदार (वय २७, रा. कसबा,बारामती) व अनोळखी तीन साथीदार आले.
हॉटेल चालकाला ‘मी एन. टी. भाई आहे.तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत. तुला हॉटेल नीट चालवायचे असेल तर दर महिन्याला माझा माणूस येईल. त्याचेकडे २५ हजार रुपये दर महिन्याला द्यायचे ,नाहीतर मी स्वत: एन. टी. भाई येईल लक्षात ठेव. तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमध्ये बसु व जेलमधून तुझा गेम करू असे म्हणून ,दमदाटी केली.तसेच हॉटेल चालकास फिर्यादीस हाताने फाईट मारली. खिशातून चाकू काढत हप्ता नाही दिला तर हॉटेल बाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडु अशी धमकी दिली.तसेच, धक्काबुक्की करून आरोपींनी हॉटेलच्या काउंटरमधील ७,२०० रुपये रोख रक्कम, हॉटेलचे लायसन्स एफ.एल.३-१६११, न्यु लिफ कंपनीचे घडयाळ असे जबरीने दरोडा टाकल्याची घटना घडली होती.
यातील आरोपी तांबे, इनामदार या दोघांसह गणेश संजय बोडरे (सर्व रा. बारामती ता. बारामती) व अनोळखी २ इसम यांच्यावर बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी मागणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. आरोपींवर मोकांअतर्गत कारवाई होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आरोपींनी गुन्हयाचे स्वरूप पाहता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईकामी प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास शिरगांवकर करीत आहेत.पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे, अतुल जाधव, अंकुश दळवी यांनी ही कारवाई केली.कारवाईबाबत पोलीस अधिक्षक डॉ.देशमुख यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.