पुणे : येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे (वय २१, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या दीपक काळोखे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), निखील ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) व त्यांचा एक साथीदार अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत. निखील शिंदे हा फरार असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
जुनेद शेख व त्याच्या साथीदारांनी २६ डिसेबर रोजी लक्ष्मीनगर येथे येऊन धारधार हत्यारे व दगड घेऊन ते हवेत फिरवून शिवीगाळ केली. कोई आगे आयेगा तो नही छोंडेंगे, अपने अपने घर जातो, असे म्हणून लोकांना धमकाविले. त्यांच्यावर दगडफेक केली. फिर्यादी व त्याचा भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील २७ वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली होती.
जुनेद शेख याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन नागरिकांच्या मनात भिती निर्माण केली. दिवसा, रात्री घरफोडी करणे, गरीब,असहाय्य युवकांना जमवून त्यांना पैशांचे व इतर प्रकारचे अमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे साथीदार बनवून त्यांच्याकडून गुन्हे करवुन घेत असल्याचे आढळून आले.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या यांना सादर केला. शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील हे तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव, जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक निरीक्षक महेश लामखडे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्या कार्यकाळातील ही १११ वी मोक्का कारवाई आहे.