पुणे : गणेशाेत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवाची सर्वत्र लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून पाेलिसही उत्सावासाठी सज्ज झाले आहेत. गणशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर फरासखाना पाेलिसांकडून आज बाबू गेणू चाैकामध्ये माॅकड्रील करण्यात आले. कुठलिही पुर्वसुचना न देता करण्यात आलेल्या या माॅकड्रीलमुळे नागरिकांना काही काळासाठी काय चालू आहे याचा अंदाज आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी घबराट निर्माण झाली हाेती. प्रत्यक्ष आगीवर नियंत्रणासह दाेन गटांतील तणावग्रस्त परिस्थितीवर पाेलिसांकडून कारवाईचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले.
पोलीस ठाण्यातंर्गत परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी बाबू गेणू चौकातील एका दुकानाच्या कोपऱ्यात धुर सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजून २० मिनीटांनी अग्निशमक दलास आगीचा कॉल दिला. तसेच परिसरात तणावग्रस्त स्थिती भासवून आजूबाजूला भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी क्यूआरटी पथकासह संबंधित विभागाला माहिती देउन पाचारण करण्यात आले होते. आग आणि तणावग्रस्त स्थितीवर प्रत्यक्ष कारवाईसाठी पोलीस प्रशासन, अग्निशमक दलासह क्यूआरटीची पथके वेळेत हजर झाली. त्यानंतर परिसरातील धुरसदृश्य परिरिस्थीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच क्युआरटी टीमसह विविध विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेउन आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
याबाबत अधिक माहिती देताना फरासखाना पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक दादा चुडाप्पा म्हणाले, शहरात आगामी गणेशोत्सवासह विविध सण उत्सव साजरे केले जाणार आहे. त्यापार्शभुमीवर पोलीस, अग्निशमक दल, क्यूआरटी टीमसह इतर संबंधित विभागाच्या तयारीची चाचपणी करण्यासाठी बाबू गेणू चौकात मॉकड्रील करण्यात आले. त्यामध्ये धुरसदृश्य परिस्थिती निर्माण करुन अग्निशमक दल, क्युआरटी टीमला पाचारण करण्यात आले. वेळेत दोन्ही टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे मॉकड्रीलद्वारे दाखवून दिले.