पुणे : संघटित टोळी तयार करुन त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करुन दहशत निर्माण करणार्या कुख्यात गुंड सचिन पोटे याच्यासह त्याच्या टोळीतील १० जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
सचिन निवृत्ती पोटे (वय ४०, रा. जोशीवाडा, नवी पेठ), अजय शिंदे (वय ३६, रा. कल्याणीनगर, येरवडा व खडक पोलीस लाईन), विठ्ठल शेलार (वय ३८, रा. उरवडे, ता. मुळशी), अजिंक्य ऊर्फ अजय ऊर्फ अज्जू पायगुडे (वय २८, रा. मानाजीनगर, नर्हे), दगडु वैद्य (वय ३६, रा. जोशी वाडा, नवी पेठ), अनुप कांबळे (वय ३६, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा), अतिक शेख (वय ३३, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी), मुन्ना ऊर्फ हेमंत कानगुडे (वय ३५, रा. खिलारेवाडी, कर्वे रोड), बाबू ऊर्फ अंकुश निवेकर (वय २६, रा. भिमनगर, पौड फाटा) अमोल चव्हाण (वय ३१, रा. बुधवार पेठ) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेतील युनिट ४ चे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीत अजिंक्य पायगुडे, अनुप कांबळे, अतिक शेख, मुन्ना कानगुडे आणि बाबू निवेकर या पाच जणांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरु आहे.
विशाल मोदी यांच्या पत्नी प्रिती यांचा वाढदिवस असल्याने ते १५ जून २०१८ रोजी हॉटेल वायकीकी टिकी लाऊंज हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करीत असताना सचिन पोटे आणि निलेश चव्हाण यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी सचिन पोटे याने निलेश चव्हाणवर गोळीबार केला. पंरतु, निलेशने गोळी चुकविली. सचिन पोटे याने गोळीबार करुन निघून जाताना त्याच्या साथीदारांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन गेले होते. सचिन पोटेच्या भीतीमुळे त्यांनी इतके दिवस तक्रार दिली नव्हती. त्यानुसार विशाल मोदी यांनी गुन्हे शाखेत येऊन तक्रार दिली.
आरोपींनी संघटीत टोळीच्या माध्यमातून गुन्हा केला असल्याने पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी या गुन्ह्यात मोक्काचा समावेश करण्याचा अहवाल दिला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे हा अहवाल पाठविण्यात आला. मोराळे यांनी त्यास मंजुरी देण्यात आली असून सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे हे तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन व वैयक्तिक मार्गदर्शन करुन सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईवर भर दिलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मोक्का अंतर्गत कारवाया करण्यात आल्या असून १५ एमपीडीए अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत.