लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर दरोडा व वाहनविरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या वतीने मोक्का अंतर्गत कारवाई केली. आरोपींकडून वाहने आणि जबरी चोरीतील ८ लाख ४६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.
अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय २४, महम्मदवाडी, हडपसर), नागेश मनोहर वाकडे (वय २१, आशीर्वाद पार्क, लक्ष्मी पार्क, महम्मदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ९ एप्रिल रोजी फिर्यादी हे महम्मदवाडी, हडपसर येथून दुचाकीने घरी चालले असता अजिनाथ गायकवाड व नागेश वाकडे यांच्या तीन साथीदारांनी दुचाकीवरून फिर्यादीच्या मागे येत त्यांच्या दुचाकीला कट दिला. त्यांना थांबवून कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून फिर्यादीच्या खिशातील १२०० रूपये, ११०० रूपयांची चांदीची अंगठी असे हिसकावून आरोपी पळून गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरोडा व वाहनविरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या गुन्ह्यात दोघांना अटक केली. जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करून दहशत पसरून स्वत:च्या आणि टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.
दोन्ही आरोपींवर अनुक्रमे १५ आणि ३ गुन्हे दाखल आहेत. दरोडा व वाहन विरोधी पथक-२ चे पोलीस उपनिरीक्षक सुनील पंधरकर यांनी आरोपींवर दाखल गुन्ह्यात मोक्का कलमांचा समावेश करावा असा अहवाल पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे सादर केला होता. त्याला मान्यता देत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन सुधाकर यादव करीत आहेत.