पुणे: पुण्यात चार, पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. काल रात्री शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हलका पाऊसही झाला. पण आज सकाळपासूनच पावसाने शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच, उपनगरातही हजेरी लावली. पुणेकर कामासाठी बाहेर पडले असताना अशा मध्यम स्वरूपाच्या पावसाने तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील सर्व पेठा, वडगाव, धायरी, हडपसर, कोथरूड, वानवडी, औंध, सर्वच ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. सकाळी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी दिसून आली. रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. काही रस्तेही घसरडे झाले होते. वाहतूक कोंडीने रस्त्यांवर छोटे अपघातही घडत होते. काही ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यांची कामे चालू असल्याने नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पुण्यात आजपासून हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात काल दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, त्यात जोर नव्हता. शहरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस
मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत पसरले असल्याने कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.