पुणे : पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांमध्ये सुसूत्रता येणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या मॉडर्नायजेशन आॅफ एअर फिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर (माफि) या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच लोहगाव विमानतळावर हा प्रकल्प सुरू होईल, असा विश्वास हवाई दलाच्या पुण्यातील तळाचे प्रमुख एअर कमांडर ए. के. भारती यांनी गुरुवारी व्यक्त केला. हवाई दलाच्या लोहगाव येथील पुणे तळाच्या ८३व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. लोहगाव येथील हवाई दलाची जागा सुरक्षित करण्यासाठी या जागेमध्ये भिंत उभारण्यात येईल. विमानांसंबंधातील उपकरणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त व चांगल्या दर्जाची असावीत यासाठी हवाई दलाकडून प्रयत्न केले जात आहेत याकडेही भारती यांनी लक्ष वेधले.भारती म्हणाले, भारतातील हवाई दलाच्या इतर तळांप्रमाणे पुण्यातही ‘माफि’चा प्रोजेक्ट उभारण्यात येत असून, त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील विमानतळामध्ये अत्याधुनिक सुविधा प्राप्त होणार आहेत. त्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम, नेव्हिगेशन, इन्स्ट्रुमेंन्टल लँडिंग सिस्टिम अशा सुविधांचा अंतर्भाव केला आहे. विमानांसाठी आधुनिक मार्गदर्शिका, विमान सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी तसेच विमानांच्या सुरक्षित उड्डाणांसाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे. या प्रकल्पाचा फायदा हवाई दलाच्या विमानांबरोबरच प्रवासी विमानांनादेखील होणार आहे, असे भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)-------विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचा विषय मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, त्याबाबत बोलताना भारती म्हणाले, की विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणे ही शहरातील महत्त्वाची गरज आहे. मात्र यासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या अंतिम सुनावणीनंतरच या निर्णयानुसार कार्यवाही होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. धावपट्टीचा विस्तार केल्यास लोहगाव येथील रस्ता नागरिकांसाठी बंद करावा लागेल. परंतु त्यासाठी महापालिकेने पर्यायी रस्ता तयार करावा अशी मागणीदेखील हवाई दलाकडून करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या निकालानंतरच या विषयावर तोडगा निघेल, असे ते म्हणाले.
पुण्याचा विमानतळ होणार आधुनिक
By admin | Published: October 02, 2015 12:48 AM