पुणे - महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची मानसिक स्वास्थ्य चाचणी घेऊन त्यामध्ये आजारी विद्यार्थी आढळून आल्यास त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याचा अभिनव प्रयोग शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयाकडून राबविला जात आहे. या प्रयोगाचे काही चांगले परिणाम दिसून आले असून इतर महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर हा प्रयोग राबविण्याची चाचपणी सुरू झाली आहे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी प्राचार्यांकडे येत असतात. त्यापैकी काही तक्रारी खूपच गंभीर असल्याचे मॉडर्नचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांच्या लक्षात आले. एका विद्यार्थिनीला वेगवेगळ्या स्वरूपाचे भास व्हायचे, तर एका विद्यार्थ्याने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी शिपायाकडे दिली होती, काही विद्यार्थ्यांचे वर्तन अत्यंत आक्रमक होते, शिक्षक बोलल्यास काही विद्यार्थ्यांना त्याचा खूपच राग यायचा. यातील काही विद्यार्थी नैराश्य, मानसिक आजारामुळे असे वर्तन करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशांना शिक्षकांनी अधिक समजून घेणे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे लक्षात झाले. मात्र, एखादी घटना घडण्यापूर्वीच असे विद्यार्थी समोर यावेत, यासाठी त्यांची मानसिक चाचणी घेण्याचे निश्चित झाले.महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली. विभागप्रमुख प्रा. अमृता ओक, श्रद्धा साकतकर, स्मिता वैद्य, अपर्णा सातपुते, आदिती खरे, विजया जगताप यांच्या टीमने त्यावर काम सुरू केले. विद्यार्थ्यांना भेडसवणाºया समस्या ओळखण्यासाठी एक मानसिक स्वास्थ्य चाचणी तयार करण्यात आली. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक आधार मिळतो का, त्यांच्यामध्ये आक्रमक वृत्ती आहे का, ते नैराश्याकडे झुकले आहेत का, हे तपासले जाते. दरवर्षी प्रथम वर्षाला प्रवेश घेणाºया १३०० विद्यार्थ्यांची ही चाचणी घेतली जाते. त्यापैकी दोन ते पाच टक्के विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आजाराबाबत अडचणी असल्याचे आढळून येत असल्याची प्रा. अमृता ओक यांनी दिली. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना याची माहिती दिली जाते. त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अधिकाधिक समजून घ्यावे, अशा सूचना दिल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर पालकांना बोलावून घेऊन त्यांच्याशीही याबाबत संवाद ठेवला जातो. यामुळे असे विद्यार्थी बरे होण्यास मोठी मदत होत असल्याचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांनी सांगितले.शालेय स्तरावरही राबविला जातोय प्रयोगमॉडर्न महाविद्यालयामध्ये राबविला जात असलेल्या हा प्रयोग थोडाशा वेगळ्या पातळीवर ‘भावनिक बुद्धिमत्ता प्रयोग’ या नावाने शाळांमध्येही राबविला जात आहे. मॉडर्न महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागास त्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून १७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. पुणे, नाशिक, ठाणे येथील ८ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.नॅक मूल्यांकनामध्ये घेतली दखलशिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगाची दखल नॅक मूल्यांकनामध्ये घेण्यात आली. त्याबद्दल सकारात्मक अभिप्रायही नोंदविला गेला आहे.
मॉडर्न महाविद्यालय : राबवला जातोय मानसिक स्वास्थ्य चाचणीचा अभिनव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:03 AM