पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे, एकूण १५ प्रशासकीय विभागांतून प्रत्येकी १ याप्रमाणे १३ मराठी व २ उर्दू माध्यमाच्या शाळांचा मॉडेल स्कूल म्हणून विकास केला जाणार आहे. शाळांच्या आधुनिकीकरणावर अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आला आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांसाठी ३११ कोटी रुपयांची तर माध्यमिक शिक्षणासाठी ५५ कोटी अशा ३६३ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. या शाळांचा व्यवस्थापन खर्च, शिक्षकांचा पगार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. प्राथमिक शाळांसाठी शिक्षण मंडळाकडून २०१७-१८ या वर्षासाठीचे अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर करण्यात आले आहे, मात्र अद्याप त्याला मुख्यसभेची मंजुरी मिळालेली नाही. शिक्षण मंडळाची मुदत संपल्यानंतर ते बरखास्त करून पालिकेकडे सोपविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. जुलै २०१७ नंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणे प्रस्तावित आहे.शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शैक्षणिक साहित्य, फर्निचर, वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्वच्छतागृह, प्रोजेक्टर आदी सुविधांसाठी खर्च केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या शाळांना मिळणार आधुनिक सुविधा
By admin | Published: March 31, 2017 3:05 AM