- नीलेश काण्णव, घोडेगाव
डोंगराखाली गेलेल्या माळीण गावातील गावकऱ्यांसाठी बांधली जाणारी नवीन घरे मात्र अभेद्य आणि मजबूत असावीत असा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने या घरांच्या भक्कमपणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. माळीण पुनर्वसनाअंतर्गत बांधली जाणारी घरे अॅल्युफॉम या नवीन तंत्रज्ञानाने बांधली जाणार आहे. यामुळे घरे मजबूत होणार आहेत. डोंगरावरून मोठा दगड या घरांवर आला तरी ही घरे पडणार नाहीत, मोडणार नाहीत किंवा हलणारही नाहीत. त्यामुळे घरातील लोक सुरक्षित राहतील. बॉक्ससारखी स्थिरता या घरांना असणार आहे. तसेच ५ रिष्टर स्केलपर्यंत भूकंपाचे हादरेदेखील ही घरे सहज सहन करू शकतील, अशा स्वरूपाची सुंदर, टुमदार घरे होणार आहेत. माळीण पुनर्वसनासाठी पायाभूत सुविधांच्या कामांना सुरवात झाली असून यामध्ये रोड, अंतर्गत रस्ते, पावसाचे पाणी निचरा करण्याचे नाले आदी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक सल्ला तसेच सुरू असलेली कामे योग्य मापदंडाप्रमाणे व उत्तम दर्जाची सुरू आहेत का, हे पाहण्यासाठी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. सीओईपीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रोफेसर भालचंद्र बिराजदार यांनी माळीणला भेट देऊन पाहणी केली. भालचंद्र बिराजदार यांनी लातूरला भूकंप झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसनामध्ये काम केले आहे. माळीण पुनर्वसनाची जागा व घरांची रचना या विषयी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, माळीण पुनर्वसनासाठी निश्चित झालेली आमडेची जागा सुरक्षित आहे. ही जागा निवडताना इंजिनिअरिंगला प्राधान्य दिले, नंतर गावकऱ्यांनी देखील सहमती दिली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. नवे माळीण ठरेल आदर्शमाळीणचे पुनर्वसन मैलाचा दगड ठरणार आहे. कारण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गोष्टी अत्याधुनिक आहेत. या घरांना शंभर वर्षे रंगवगळता काहीही करण्याची आवश्यकता नाही. पूर्ण घर स्टिल व काँक्रीटमध्ये होणार आहे. ही घरे अॅल्युफॉममध्ये होणार आहेत. यामध्ये अॅल्युमिनियमचे पडदे नटबोल्टमध्ये फिट करून काँक्रीट भरले जाते. त्यामुळे फिनिशिंग चांगले येते. साईटवर एखाद्या लेबरने चुका करायच्या म्हटल्या तरी होत नाहीत, तसेच घरांच्या आकारात बदल होत नाहीत. हे साधेच तंत्रज्ञान आहे, फक्त वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ७ मजली २०० इमारती अशा तंत्रज्ञानाने बांधण्यात आल्या आहेत.या तंत्रज्ञानाच्या कामांसाठी खर्चदेखील कमी येतो तसेच काम वेगाने होते. काँक्रिटच्या कामांमध्ये एक महिन्यात एक मजला होतो. यामध्ये पाच दिवसांत एक मजला पूर्ण होतो. लातूरच्या मानाने माळीणचे आपत्ती व्यवस्थापन छोटे असले तरी माळीणच्या पुनर्वसनासाठी खूप लोक एकत्र येऊन जलद गतीने काम करत आहेत. प्रत्येक घराला पाणी, बसस्टॅण्ड, दुकाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा तसेच मुख्य रस्ता ९ मीटरचा तर अंतर्गत रस्ते ६ मीटरचे केले जाणार आहेत.