मंचर: ‘आधुनिक काळातील व्यवसाय, उद्योग किंवा कोणतीही संस्था यांच्या विकासात प्रशासकीय कार्यालयाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कारण प्रशासकीय कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर संस्थेची वाढ, विकासाची कार्यक्षमता अवलंबून असते म्हणून प्रशासकीय कामकाजात आधुनिकता येणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन कराड येथील एस. जी. एम. विद्यालयाचे रजिस्ट्रार राजेंद्र गायकवाड यांनी केले.
अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अंतर्गत ‘संस्था वाढीसाठी प्रशासकीय कार्यपद्धती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राजेंद्र गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे होते. यावेळी व्यासपीठावर कार्यालयीन अधीक्षक व कार्यशाळेचे समन्वयक प्रभाकर पारधी होते.
एक दिवशीय कार्यशाळेत राजेंद्र गायकवाड यांनी अकाउंट, टॅली, शिष्यवृत्ती प्रक्रिया, त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, परीक्षा कामकाज, आवक-जावक, विविध प्रकारची कर व्यवस्था, ऑडिट प्रकिया इत्यादी विषयावर माहिती दिली.
प्राचार्य डॉ. के.जी. कानडे म्हणाले की, संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य नियोजन, संघटन आणि नियंत्रण या गोष्टी प्रशासकीय कामकाजामध्ये महत्त्वाच्या ठरतात, कारण त्यातूनच योग्य व्यवस्थापन घडते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर पारधी यांनी केला. तर उपस्थित मान्यवरांचे आभार एस. एच. बोऱ्हाडे यांनी मानले.