पुणे : नरेंद्र माेदी हे दहावी नापास आहेत. त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी. मी त्यांची बदनामी करताेय असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करावा. परंतु ते तसं करणार नाहीत. कारण त्यांच्याकडे डिग्रीच नसल्याचा आराेप अॅड प्रकाश आंबेडकरांनी केला. पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी आज एसएसपीएमएसच्या मैदानावर त्यांची सभा आयाेजित करण्यात आली हाेती, त्यावेळी ते बाेलत हाेते.
आंबेडकर म्हणाले, माेदी हे दहावी नापास आहेत. हे खाेटे असेल तर त्यांनी माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करावा. काॅंग्रेसबद्दल बाेलताना आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे अनेक कार्यकर्ते खासगीत वंचितचे काैतुक करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी फाेनकरुन पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे काॅंग्रेसने आम्हाला उघड उघड मदत करावी. गांधी जाऊन इतकी वर्षे झाली तरी आजही गांधीजींच्या पुतळ्याला गाेळी घातली जात आहे. गांधींना गाेळ्या घालणारी जमात आजही आहे. काॅंग्रेसावाले म्हणतात काॅंग्रेसला वाचवा. अनेकदा वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आराेप हाेताे. आम्ही काॅंग्रेसशी भांडू मात्र भाजपासाेबत कधीही जाणार नाही.
काॅंग्रेस, राष्ट्रवादी मध्ये वंचित घटकांना संधी न मिळाल्याने त्या पक्षाचे कार्यकर्ते फाेन करुन वंचितला पाठिंबा देतात. या पक्षांमध्ये घराणेशाही असल्याने त्यांना हा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडी घराणेशाही माेडून काढू शकते. त्यामुळे ते वंचितला पाठींबा द्यायला तयार झाले आहेत, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.