मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:49 AM2024-04-30T11:49:55+5:302024-04-30T11:50:34+5:30
लोकसभेसाठी मतदान झालेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कौल लक्षात घेता भाजपचा राज्यातच नव्हे, तर देशात पराभव होणार
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सर्वाधिक भीती कोणाची वाटत असेल तर ती नेहरू, गांधी परिवाराची. काँग्रेसच्या विचारांची. त्यामुळेच ही निवडणूक धर्मावर नेण्याचा त्यांचा डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. देशात इंडिया फ्रंटला तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसभवनमध्ये सोमवारी दुपारी पटोले यांची पत्रकार परिषद झाली. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, लोकसभेसाठी मतदान झालेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कौल लक्षात घेता भाजपचा राज्यातच नव्हे, तर देशात पराभव होणार आहे. मोदी सातत्याने नेहरू, गांधी परिवारावर टीका करतात. त्यांची त्यांना भीती वाटते. त्यामुळे आता ते ही निवडणूक हिंदू-मुस्लीम अशी धर्मावर जावी यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये कुठेही आम्ही धर्माचा उल्लेख केलेला नाही. जातनिहाय जनगणना करून या देशाचे सामाजिक वास्तव आम्ही जनतेसमोर आणू, असे त्यात नमूद आहे. तरीही मोदी आम्ही संपत्तीचे पुनर्वाटप करून मुस्लिमांना संपत्ती देणार असल्याची खोटी टीका करत आहेत.
आपण पंतप्रधान आहोत याचे भान मोदी यांनी सोडले आहे, असेही पटोले म्हणाले. मागील १० वर्षात त्यांनी जनतेसाठी काय केले ते सांगावे इतकीच आमची मागणी आहे, मात्र ते प्रचारसभात काँग्रेस, काँग्रेसचे नेते याशिवाय दुसरे काहीच बोलायला तयार नाहीत. काँग्रेसने नेते तयार केले. भाजपला कधीच नेते तयार करता आले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आमचे, दुसऱ्या पक्षातील नेते घेतले.
सकाळी आरोप करायचे, धमक्या द्यायच्या, ‘एक तर आमच्याबरोबर या, नाहीतर तुरुंगात जा’ असे ब्लॅकमेलिंग करायचे. आता तेही होत नाही तर मग धर्माचा विषय काढून निवडणूक तिकडे न्यायची, असा त्यांचा डाव आहे, असेही पटोले म्हणाले. काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांचा विकास साधणारा पक्ष आहे. भाजपप्रमाणे आम्ही कधीच धर्माचे राजकारण करणार नाही, असेही पटोले म्हणाले.
बैठकीपूर्वी पटोले यांनी पुण्यात ३ मे ला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सभेसाठीच्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. सभेची माहिती लोकापर्यंत पोहचवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.