पुणे - केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेचपण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे, देशातील असंघटित कामगारच त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व आॅल इंडिया इंटकचे उपाध्यक्ष रामचंद्र खुंटिया यांनी केली.राष्ट्रीय मजदूर संघाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.खुंटिया यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भाई जगताप, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष इरफान आलम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते.संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संघटनेच्या कामाचा धावता आढावा घेत कामगारांचे हित केंद्रव राज्य सरकारने धोक्यात आणले असल्याची टीका केली. असंघटित कामगारांची संख्या वाढत आहे,त्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत व सरकार त्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे असे इरफान आलम यांनी सांगितले. या कामगारांना संघटित करून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येतील, असे ते म्हणाले.आमदार जगताप, हर्षवर्धन पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली. सुजाता आल्हाट, वैशाली कटके, जयद्रथ सावंत, भीमराव कांबळे यांचा कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यातआला. सीताराम चव्हाण यांनी स्वागत केले. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. पळसे यांनी आभार मानले.काँग्रेसने कधीही कामगारांना देशोधडीला लावले नाही, कामगारहिताचे कायदे काँग्रेसच्याच काळात झाले, आता मात्र केंद्र सरकारने त्या कायद्यांची मोडतोड चालवली आहे. मालकधार्जिण्या या धोरणाचा देशातील सर्व कामगार एकत्र येऊन विरोध करतील व हे सरकार खाली खेचेल असा विश्वास खुंटिया यांनी व्यक्त केला.
मोदी सरकार कामगारविरोधी, इंटकची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:19 AM