पुणे : पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूवरील सतत दरवाढ होत आहे. या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील संभाजी बागेबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'मोदी महागाई बाजार' भरवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मोदी महागाई बाजारात पालेभाज्या, केळी, गाजर, मासे विक्रीस ठेवण्यात आले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
मोदी महागाई बाजार किराणा दुकान, भाजी विक्री, पुष्प भांडार, महिला बचत गट, फळ विक्री, अमृततुल्य, मासळी अशी स्टॉलला नाव देण्यात आली होती. मासे विक्रीच्या स्टॉलवर भाजपच्या नेते मंडळीची नावे देऊन विक्री करण्यात आली. त्यामध्ये 'चंपा पापलेट, गोपी बांगडा,' अशी नाव होती.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, 2014 पर्यन्त जो चहा 3 रुपयांना होता आणि तेलाचा डबा 1200 पर्यंत होता. आता तोच तेलाचा डबा 2800 रुपयांना मिळत आहे. अशीच दरवाढ इतर वस्तूंची देखील असून त्यामुळे आम्ही आज मोदी महागाई बाजार आयोजित करून केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत, यापुढील काळात महागाई नियंत्रणात न आल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.