पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामधे विकासाचा मुद्दा सोडून राष्ट्रवाद, पाकिस्तान हे मुद्दे आणले आहेत. त्याआडून ते पाकिस्तान नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य करत आहेत, अशी टीका खासदार हुसेन दलवाई यांनी येथे केली. देशात त्यांच्याशिवाय देशभक्त कुणीच नाही, असे त्यांना वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राष्ट्रवाद हा त्यांचा मुद्दा असूच शकत नाही. हे सरकार केवळ भांडवलदारांसाठी राबलेले आहे. या भांडवलदारांची पाकिस्तानमध्ये गुंतवणूक आहे. मोदींना त्यांची काळजी जास्त आहे. म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते प्रेमपत्र पाठवतात. भारतात पुन्हा मोदी सरकार आले तर शांतता प्रस्थापित करण्यास मदत होइल, असे इम्रान खान बोलतात. यावरून मोदींची पाकिस्तान विषयीची भूमिका स्पष्ट होते.वंचित आघाडीचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही. दोन-चार लोक तिकडे गेले म्हणून काहीच फरक पडत नाही, असे दलवाई म्हणाले.>‘मोहिते पाटील यांच्याबाबत लवकरच निर्णय’अकलुज येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर होते. मोदींच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला, याविषयी अंकुश काकडे म्हणाले, पंचाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आल्याचे मोहिते पाटील सांगू शकतात. पण माढा मतदारसंघात विरोधी उमेदवाराचा ते उघडपणे प्रचार करत आहेत. हा पक्षशिस्तीचा भंग आहे. पुढील दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाईबाबत पक्ष निर्णय घेईल.
मोदींकडून पाकिस्तान नव्हे, देशातील मुस्लीमच लक्ष्य - हुसेन दलवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:22 AM