बारामती : नरेंद्र मोदी यांनी बारामतीला भेट द्यावी, अशी शरद पवार यांची खूप जुनीच इच्छा आहे. तो योग थेट मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जुळून आला आहे. पवार केंद्रात कृषिमंत्री असताना मोदींनी त्यांचे कृषी विकासाबाबत मार्गदर्शन घेतले होते. त्यामुळे खास पवारांची कृषी शाळा पाहण्यासाठी मोदी बारामतीच्या शिवारात येत आहेत. २०११ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवार केंद्रात कृषिमंत्री होते. त्या वेळी गुजरातमधील कृषीच्या विकासासाठी बारामतीतील काही यशस्वी योजनांची माहिती मोदी यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी पवार यांची भेटही घेतली होती. पवार यांच्या कृषिविषयक धोरणाचे मोदी यांनी त्या वेळी कौतूकही केले होते. तेव्हापासूनच पवार त्यांना बारामतीचे निमंत्रण देत होते. माढा मतदारसंघातून शरद पवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली, त्या वेळी त्यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांनी भाजपाकडून उमेदवारी केली होती. पवारांविरोधात तुम्ही लढा म्हणजे पवारांचा तुम्हाला जवळून परिचय होईल, असा खास सल्ला त्या वेळी मोदींनी देशमुख यांना दिला होता. अशी एक खास आठवण आज पवार यांच्या निकटवर्तीय नेत्याने सांगितली. गुजरातमधील सहकारी तत्त्वावरील अमूल दूधाचे मॉडेल पाहून पवारांनी बारामतीतही ते मॉडेल राबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे उद्याच्या मोदी-पवार भेटीमागे हे सगळे संदर्भही दिले जात आहेत.(प्रतिनिधी)
मोदी-पवारांचे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध
By admin | Published: February 13, 2015 11:42 PM