पिंपरी (पुणे) :
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदी यांनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा आहे.
प्रोटोकॉलनुसार विमानतळावरील स्वागतासाठी पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. मोदी यांना अजित पवारांनी हात जोडले. मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजपप्रेमाविषयीच्या राजकीय चर्चेला दुपारी सोशल मीडियावर उधाण आले.
देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर फडणवीस यांनी पाच मिनिटांचे भाषण केले. प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलणे अपेक्षित होते. मोदी यांनी पवार यांना भाषणासाठी खुणावलेही; परंतु त्यांनी नकार दिला. मोदी यांनी २० मिनिटांचे भाषण केले.
हा महाराष्ट्राचा अपमान : खा. सुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण नाकारले जाते. पण, याच मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी दिली जाते, ही बाब दुर्दैवी असून, महाराष्ट्राचा अपमान करणारी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केली. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होते. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारण करते हे अजिबात शोभणारे नाही, असे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.