लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरातील महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करत काँग्रेसने गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेश प्रभारी बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची घोषणा या वेळी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून गुरुवारी सकाळी मोर्चा सुरू झाला. बसवराज यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे अनेक पदाधिकारी सायकलवर सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला. तिथे पाटील यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांचीही भाषणे झाली. दरवाढीवर नियंत्रण ठेवून जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्रातील भाजपा सरकार राज्यातील राजकारण करण्यात गुंतले आहे, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी, असे ते म्हणाले.
पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात सलग आठ दिवस आंदोलन करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अमीर शेख, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके आदींनी आंदोलनात भाग घेतला.