पुणे : आपले पंतप्रधान विश्वसार्हता गमावून बसले आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये ताेचताेचपणा आहे. माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच असे म्हणत खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींवर टीका केली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्री आज पुण्यातील गांधीभवन येथे आली. त्यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये शत्रुघ्न सिन्हा बाेलत हाेते. यावेळी यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते.
सिन्हा म्हणाले, मी या गांधी शांती यात्रेसाेबत आहे. आज देशाला शांततेची गरज आहे. देशातील तरुण आज आक्राेशीत आहेत. तरुणांनी जी चळवळ सुरु केली आहे, अशी चळवळ अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. ही चळवळ पाहून जे. पींच्या चळवळीची आठवण झाली. देशातील सध्याच्या वातावारणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बाेबडे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आपल्या प्रधानमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. माेदी बाेलतात वेगळंच आणि करतात वेगळंच. देशात डिटेंशन कॅम्प नाहीत असे माेदी म्हणाले हाेते, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी असे कॅम्प बांधल्याचे समाेर आले आहे.
सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबवणार नाही : यशवंत सिन्हा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज देशात प्रक्षाेभक वातावरण आहे. आपले संविधान धाेक्यात आले आहे. देशाचे विभाजन करण्याचे काम सरकार करत आहे. सरकारचे हे कारस्थान ओळखून विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. संसदेत बहुमत मिळाल्यानंतर आता सरकारचा छुपा अजेंडा समाेर येत आहे. याची माेठी किंमत देशाला माेजावी लागणार आहे. जेएनयुतील हल्ल्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सरकारने गुंड पाठवून जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चाेपून काढले. विद्यार्थ्यांचे आंदाेलन चिरडून टाकण्याचे काम सरकार करत आहे.