लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाला पूरक आंदोलन उभारले जाईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिला. मोदी-शहा या जोडीला शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागेल, असे ते म्हणाले.
मंगळवारी (दि. १५) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उपाध्यक्ष अजित अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे यावेळी उपस्थित होते.
नवले म्हणाले की, केंद्र सरकारची हीच भूमिका राहिली तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. सरकारने लोकशाही विरोधी पद्धतीने मंजूर करवून घेतलेले तीन शेतकरी कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना आधारभावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा केंद्रीय स्तरावर करावा, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावेत या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे.
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. यासाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे नवले म्हणाले.