पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखात घेतली. त्यात माेदींनी पुण्याचा एक किस्सा सांगत पुण्यातील समावाद्यांवर टीका केली हाेती. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटल हाेते. त्याला पुण्यातील समाजवादी विचारवंतांनी उत्तर दिले आहे. माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया या विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली.
मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात. असा किस्सा माेदी यांनी मुलाखतीत सांगितला हाेता.
याबाबत लाेकमतने पुण्यातील समाजवादी विचारवंतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी म्हणाले, माेदींनी सांगितलेला किस्सा हा बनावट वाटताे. माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती. अक्षय कुमार यांनी माेदींची घेतलेली मुलाखत ही पाेरकट हाेती. माेदी हे मला संभ्रमित व्यक्ती वाटतात. माेदी हे पंतप्रधान या पदाला शाेभत नाहीत. माेदींनी मुलाखतीत पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा हा खाेटा वाटताे. आधीच्या काळी काही तथाकथित पुणेकर हे थाेड्या पुढे जाऊन रिक्षा घेतल्यास पैसे कमी पडतील म्हणून स्टेशनपासून काही अंतर चालत जाऊन रिक्षा घेत असत. त्यात रिक्षाचे भाडे कमी लागावे असे त्यांना वाटत असे. असाच काहीसा किस्सा त्यांना प्रकाश जावडेकर किंवा गिरीश बापट यांनी सांगितला असेल. त्यात माेदींनी ताेडफाेड करुन समाजवाद्यांचा किस्सा म्हणून सांगितला आहे. प्रत्यक्षात त्याकाळी रिक्षा हे सर्वसामान्य पुणेकरांचे वाहन नव्हते. रिक्षा हे पांढरपेशी नागरिकांचे वाहन हाेते. त्यामुळे असा कुठला किस्सा घडला असेल असे वाटत नाही. तसेच यामुळे समाजवाद्यांचा किंवा पुणेकरांचा कुठला अपमान हाेताेय असे मला वाटत नाही.
सुभाष वारे म्हणाले, माेदींनी अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत पुण्याचा जाे किस्सा सांगितला ताे मला स्वरचित वाटताे. रिक्षावाला समाजवाद्यांबाबत असे काही बाेलेल असे वाटत नाही. आत्ताच्या लखनाै आणि पटणातील काही समाजवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे म्हंटला असता तर गाेष्ट वेगळी हाेती. परंतु महाराष्ट्रातले समाजवादी हे साधे राहणारे तसेच समाजासाठी कष्ट करणारेच आहेत. महाराष्ट्रात अनेक थाेर समाजवादी हाेऊन गेले आहेत. एस. एम. जाेशी, नारासाहेब गाेरे, ग.प्र. प्रधानांच्या, डाॅ. बाबुसाहेब काळदाते यांची थाेर परंपरा असलेल्या समादवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे काही बाेलेल असे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, त्यांचा माेदींनी एकदा अभ्यास करावा. ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याच्याशी ते कुठे मेळ खातं यावर देखील त्यांनी कधीतरी भाष्य करावं.