फेरफार अदालत दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या बुधवारी घेण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागाकडून सर्व मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. ज्याप्रमाणे मंत्री जनता दरबार घेतात तशाच पद्धतीने ही फेरफार अदालत गाव पातळीवर चालविली जाणार आहे. यामधून नागरिकांचे महसूल विभागाकडील अनेक प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होणार आहे, असे उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी निरीक्षक म्हणून हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून वैशाली गोसावी, उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, उरुळीचे गाव कामगार तलाठी प्रदीप जवळकर, खामगाव टेकच्या तलाठी अर्चना वनवे, नायगावचे तलाठी निवृत्ती गवारी, रामलिंग भोसले व अन्य सहकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या अभियानांतर्गत आज ६५ साध्या नोंदी, १२ वारस नोंदी, ५ तक्रार नोंदणी अशा एकूण ८२ नोंदींचा निपटारा करण्यात आला. तसेच १५ उत्पन्नाचे दाखले ५ गृहचौकशी अर्ज निकाली काढण्यात आले. १० प्रतिज्ञापत्रे नागरिकांना या फेरफार अदालतीमधून देण्यात आली.