पुणे : अनेक वर्षांपासून होणार...होणार म्हणून रखडलेल्या पुण्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला असून केंद्र शासनाच्यास्तरावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली असून मेट्रोला केंद्राची अंतिम मान्यता दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ जून रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीचा राष्ट्रीय कार्यक्रम पुण्यात होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाचे सचिव राजीव गौबा यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाची राज्य शासनाच्या मदतीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये मोदी यांच्या स्मार्ट सिटी योजनेबाबत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुण्याच्या मेट्रोला अंतिम मान्यता दिल्याची घोषणा मोदी यांच्याकडून केली जाणार आहे.पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी या १५ किलोमीटर अंतरावर मेट्रो धावणार आहे. याबाबत दिल्ली रेल कार्पोरेशनच्यावतीने २००९ मध्ये या मार्गाचा आराखडा, त्याला येणारा खर्च याचा प्रस्ताव तयार करून महापालिकेला सादर केला. महापालिका, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताही दिली होती. मेट्रोचा प्रस्ताव सध्या पीआयबीसमोर सादर होणार आहे. पीआयबीच्या मान्यतेनंतर त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर उमटवली जाईल, त्याची घोषणा मोदी यांच्याकडून केली जाणार आहे.पुणे महापालिकेची आगामी निवडणुक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीमध्ये मेट्रोचा मुदद प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहे. मेट्रो रखडल्याचे खापर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपवर फोडले जाण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीपूर्वी मेट्रोच्या भुमिपूजनाचा नारळ फोडण्याची तयारी चालविण्यात आलेली आहे.
मेट्रोची घोषणा मोदी करणार
By admin | Published: June 16, 2016 4:01 AM