पुणे: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार आहे. देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास या सरकारची धोरणे कारणीभूत ठरली आहेत. देशाची स्थिती बिकट आहे. कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय सुरू असलेला कारभार देशाला हानिकारक असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केली.
पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहराध्यक्ष बागवे म्हणाले, मागील सात वर्षे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेच्या हितापेक्षा उद्योजकांचे हित जपले गेले. जीएसटी, नोटबंदीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शेतकरी प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले असून शेतीसंबंधी काळे कायदे करण्यात आले. अनेकांचे रोजगार बुडाले असून कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आले. लसीकरणाबाबतही हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. विदेशात लसी पाठवून आपल्याच देशातील जनतेला वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केल्याचे बागवे म्हणाले.